पवार, पॉवर आणि पॉलिटिक्स
सोनिया गांधी यांनी दिल्लीत प्रीती भोजनाचा कार्यक्रम घेतला. यात शरद पवार सक्रिय दिसले. लगेच दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी शरद पवारांची भेट घेतली.
यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. सोनिया गांधी यांनी शरद पवारांना काँग्रेसची ऑफर दिली. अश्या बातम्या प्रसारमाध्यमावर प्रसारित व्हायला सुरुवात झाली.
सोनिया गांधी यांनी शरद पवारांना कोणती ऑफर दिली ? काँग्रेसची की पंतप्रधानपदाची ?
शरद पवार आपली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन करतील हे तर काही शक्य नाही. 1999 ते 2014 पर्यंत सत्तेत राहिलेला पक्ष कोण स्वतः संपवेल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत शरद पवारांची एकाधिकारशाही आहे. म्हणुन पवार काँग्रेस मध्ये जाणे ही फक्त बातमीच राहील यात काही तथ्य नाही.
मात्र शरद पवारांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली जाईल का ? ही बातमी महत्त्वाची आहे. ही बातमी सत्यात उतरू शकेल.
कारण मोदी, शाह या झंझावाताला थांबवण्यासाठी त्यांच्या तोडीचाच चाणक्य लागेल. हे आता सर्वांना कळुन चुकले.
सोनिया गांधी यांनी 20 पक्षांना एकत्र आण्याचे काम केले. या 20 पक्षांना बांधुन ठेवणाऱ्या नेत्याची गरज आता आहे. राहुल गांधी यांचे वय आणि राजकारणातील अनुभव फार कमी आहे. त्यामुळे राहुल गांधी ही मोट घट्ट ठेवण्यास अपयशी ठरतील याची जाणीव काँग्रेस नेत्यांना देखील आहे.
मोदी,शाह सारख्या नेत्यांना युती टिकून ठेवता आली नाही. शिवसेना,टीडीपी या दोन पक्षांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी मधुन फारकत घेतली. युती टिकून ठेवण्यासाठी फार कस लागतो. पक्षा-पक्षात संवाद लागतो.
मात्र शरद पवार यांचा संयुक्त पुरोगामी आघाडी मधील 20 पक्षांशी संवाद आणि सहवास आहे.
महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात युतीच्या पर्वाची सुरुवात शरद पवार यांनीच केली. त्यामुळे त्यांचा यात गाढा अनुभव आहे. हे युती पर्व समजुन घेण्यासाठी आपल्याला इतिहासात जावे लागेल.
1975 ची आणीबाणी संपली आणि 1977 मध्ये केंद्रात जनता पक्षाची सत्ता आली. आणीबाणी नंतरच्या 1978 च्या निवडणुकीत यशवंतराव चव्हाण यांच्या बद्दल महाराष्ट्रातील काँग्रेस मध्ये घुसमट वाढली. काँग्रेस मधील बंडांनी यशवंतरावांना मुख्यमंत्री पदावरून सारून वसंतदादा पाटील यांना संधी दिली. याचाच फायदा घेण्याचे शरद पवार यांनी ठरवले. वसंतदादा पाटील सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. त्यांनी रेड्डी काँग्रेस व इंदिरा काँग्रेस पक्षातील 22 आमदार फोडले व सत्तेमधून बाहेर पडले. तेव्हा जनता पक्षाचे 99, शेकापचे 13, मार्क्सवाद्याचे 9 असे साधारण सव्वाशे आमदार विरोधी पक्षात होते. शरद पवारांनी तेव्हा या सर्वांना एकत्र करत स्वतःचे महाराष्ट्रातील बिगर काँग्रेस सरकार स्थापण्याचे काम केले. शरद पवार यांनी 1978 साली पुरोगामी लोकशाही दल स्थापन करून वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यात गंमत अशी की त्यांचे 22 आमदार असताना यात पवार गटाचे अर्धे मंत्री होते. बाकी जनता पक्ष आणि शेकाप यांच्या तोंडाला पाणी पुसले होते.
शरद पवारांच्या तडजोडीच्या राजकारणाची जाणीव सोनियांना आहे. पवारांनी 1999 साली सोनिया गांधी यांना विरोध करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन केली आणि त्याचवर्षी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत एकत्र देखील आले. सत्तेसाठी समीकरण जुळवण्याची कला पवारांना अवगत आहे.
सध्या देशात युती टिकून ठेवण्यासाठी शरद पवारांसारखा दुसरा कोणता नेता उरला नाही. याची जाणीव कदाचित सोनिया गांधी यांना आहे.
काँग्रेस मधील नेत्यांचा आणि गांधी घराण्याचा शरद पवारांवर फार मोठा प्रभाव आहे. ही सोनिया गांधीसाठी पवारांबद्दलची जमेची बाजु आहे. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे राजकारण पवारांनी फार जवळुन पाहिले. त्यांच्या कार्याची संकल्पना पुरेपूर पवारांना माहीत आहे. 1980 नंतर शरद पवारांनी पुन्हा काँग्रेस मध्ये यावे असा अट्टहास इंदिराजींनी धरला होता. मात्र त्या काही शरद पवारांचे मन वळवण्यास यशस्वी झाल्या नाही. राजीव गांधींना शरद पवारांची किंमत माहीत होती. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा त्यांनी पवारांचा समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करावा लावला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की गांधी घराण्यातील प्रत्येकाला पवारांची गरज भासते.
शरद पवारांना आघाडीचे नेतृत्व दिले तर ते त्यात हुकूमशाही सुरू करतील किंवा इतर पक्षांना टाळतील याची सुद्धा शक्यता नाही. कारण आजवरचा शरद पवारांचा इतिहास बघितला तर ते विरोधी नेत्यांना देखील आपलेसे करणारे म्हणुन ओळखले जातात. 2 वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी मी शरदरावांचे बोट पकडुन राजकारणात आलो असे वक्तव्य केले. यावरून त्यांचे विरोधी नेत्यांसोबत देखील कसे संबंध आहेत. हे संपुर्ण भारताने पाहिले.
15 वर्षांचा शरद पवारांना केंद्रातील अनुभव आहे. ही एक सकारात्मक बाजु पवारांच्या उपयोगी पडेल.
शरद पवार यांना पंतप्रधांन पदाचे उमेदवार घोषित करून काँग्रेस जिंवत ठेवता येईल.
आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता आज फक्त शरद पवार यांच्याकडेच उरली आहे.
- रजत देशमुख
Comments
Post a Comment